पुणे : पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात राज्यशास्त्र शिकणाऱ्या अंकुश आरेकर या तरुणाची 'बोचलं म्हणून...' ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसतेय.
गदिमांचे वारसदार म्हणून पिंपरी-चिंचवडमधील अंकुशराव लांडगे सभागृहात ज्या सात कविंचा सहभाग होता... त्यातलाच एक अंकुश... अंकुशनं पहिल्यांदा त्याच्या मनातील खदखद कवितेच्या रुपानं इथं मांडली आणि सोशल मीडियातून व्हिडिओद्वारे ती सर्वांच्याच समोर आली.
थेट पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर अंकुशनं या कवितेतून जोरदार टीका केलीच आहे... परंतु, 'तूच सांग भारतमाते यात तुला कुठला राष्ट्रद्रोह दिसतो...' असं म्हणत तो आपल्या कवितेचा शेवटही करताना दिसतोय.
लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून,
आम्हाला साला म्हणायला याची जीभ रेटतेच कशी
मला तुम्हाला विचारायचं,
अशा 'दानवां'ना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी?
काळ्या ढेकळाचं रान... काळ्या डांबरानं माखवलं,
आम्ही आडोसा मागत होतो... स्वप्न लवासाचं दाखवलं...
आज पोरी बसतात तिथे काल पाखरं बसत होती,
अन् पोरांच्या जादूसारखी गोफण फिरत होती...
मित्रांनो हे असंच होणार काळी माती झाकली ना तर नाती उघडी पडत जाणार...
अहो माणसांचं काय हो... माणसातलं जनावरं चारा खाऊन जगताना पाहिलं,
पण अशानं मुकी पाखरं मरत राहणार...
सपत पांढऱ्या भातावरती झोपी जातो अर्धा भारत माझा,
अन् चटणी भाकरी खातो इथला शेतकरी राजा...
अहो चहा नसतोच कपात आमच्या,
कोरडा पाव येतो घामाने भिजून हाती...
मला विचारायचं फुगवून फुगवून होतेच कशी ५७ इंच छाती...
अहो, ५६ इंचच काय माझा बाप ११२ इंच फुगवतो,
तर तो काय इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो
अहो, बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून, संपत आलेल्या साबनाची चिपळी
नव्या साबनाला चिकटवून वापरणारी आपली आईच असते किती साधी...
मी चहा विकला असं सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी,
अहो, कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का?
अहो, विकला असेल चहा म्हणून देश विकायचा असतो का...?
पंतप्रधान होण्यासाठी लहानपणी चहा विकण्याचं भांडवलं केलं,
पण एकदा सांगा मोदी, तुमच्या चहाच्या टपरीवर कोण-कोण चहा प्यायलं?
अहो, पोटच्या पोरावर हक्का सांगावा तसा,
हक्क सांगितला जातो टेबलाखालच्या लाचेवर...
यांना कुठे माहीत असतं तेवढ्यासाठी
किती भेगा पडल्या माझ्या बापाच्या टाचेवर...
एक्स्प्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतो वाटतो वरून
पण एसीतला प्रवास फक्त श्रीमंतीचा होतो...
पण गरिबी तशीच राहते मागे जनरलचा डब्बा भरून...
अहो, कोरडा दुष्काळसुद्धा फोडतो बाप माझा,
पोलादी छातीमधल्या दमावर...
अहो, पावसावर कुणीबी शेती करतो,
पण माझा बाप शेती करतो अंगावरच्या घामावर....
आता जगभर प्रवास करा मोदी...
पण रिकाम्या पोटाने झोपणाऱ्या अर्ध्या अधिक भारताचा झोप लागेपर्यंतचा
अगतीकतेचा प्रवास तुम्हाला कधीतरी समजून घ्यावाच लागेल
पंतप्रधानपदाचा नाही देणार तुम्ही,
पण माझ्याजवळ तुमच्या माणूसपणाचा राजीनामा द्यावाच लागेल...
रिकामं पोट आतून भुखेचे डंख मारायलं लागतं
तेव्हा काश्मिरच्या प्रश्नापेक्षा पोटाचा प्रश्न आमच्यासाठी अधिक महत्वाचा वाटतो
तूच सांग भारतमाते यात तुला कुठला राष्ट्रद्रोह दिसतो