रायगड : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. या संपानं शेतकऱ्यांच्या पहिल्या संपाची आठवण पुन्हा ताजी झालीय.
देशातला शेतकऱ्यांचा पहिला संप रायगड जिल्ह्यातल्या 'चरी' या गावात झाला. हा संप तब्बल सात वर्ष चालला.
खोती पद्धतीमुळे कोकणातील शेतकरी गांजले होते. कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, ही अन्यायकारक पद्धत इथं सुरू होती. ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी याविरुद्ध संप पुकारला.
शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या कुळांनी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साथ लाभली. त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने कोर्टात उभे राहिले.
तत्कालीन महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनी चरीला भेट देवून चर्चा केली. शेतकरयांच्या लढयामुळे त्यावेळी अनेक कुटुंबांची ससेहोलपट झाली असली तरी पुढच्या पिढीला या आंदोलनामुळे अच्छे दिन आले. चरी कोपरच्या लढ्यामुळे कसेल त्याची जमीन हे धोरण अमलात आले. कूळ कायदा तयार करण्यात आला.