मुबंई : राज्याच्या राजकारणातील समीकरण बदलताना दिसत आहेत. शिंदे गट वेगळा झाल्यानंतर शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्नात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन संभाजी ब्रिगेडसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी युती केल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. अशातच या युतीवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली, असं म्हणत राजू पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यासंदर्भात राजू पाटील ट्विट केलं आहे. 'मातोश्री'वर पत्रकार परिषदेत या युतीबाबत घोषणा करण्यात आली.
आम्ही दोन्ही शिवसैनिक आहोत, आजवरचा जो इतिहास आहे तो मराठी माणसांचा म्हणा किंवा मराठ्यांचा म्हणा. आपण एकत्र येऊन एक नवा इतिहास घडवू, दुहीच्या शापालाच गाढून टाकू. आमची भूमिका रोखठोक आहे म्हणून आम्ही एकत्र आलो असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सत्तेविना मती गेली,
जो मिळेल त्याच्याशी युती केली…!#Maharashtra— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 26, 2022
संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांना घेऊन एकत्र लढण्याचं धोरण अवलंबलं आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे, असं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, सेना- ब्रिगेड युतीबाबत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीही टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीचा फुसका बार सोडला असून या युतीचा काहीही फायदा होणार नसल्याचं बावनकुळे म्हणाले. येत्या निवडणुकांमध्ये ही युती कितपत यशस्वी मिळवते याचं चित्र स्पष्ट होईल