Sharad Pawar on Governor koshyari : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील नायक होते, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) यांच्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षान्त समारंभात बोलताना त्यांनी हे विधान केले होते. या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर त्यांना हटवण्याची मागणी केली जात आहे. माध्यमांसोबत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आता भूमिका मांडली आहे. अनेक गोष्टींवर वादग्रस्त वक्तव्ये करणे हा त्यांचा लौकिक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
"वाद आहे असं मला वाटत नाही. राज्यपाल ज्यावेळी बोलले त्यावेळी मी व्यासपीठावर होतो. नितीन गडकरी आणि मी व्यासपीठावर असताना त्यांनी तो उल्लेख केला. या राज्यपालांचे वैशिष्ट हे आहे अनेक गोष्टींवर वादग्रस्त वक्तव्ये करणे हा त्यांचा लौकिक आहे. चुकीचे विधाने करणे, समाजामध्ये गैरसमज वाढेल याची खबरदारी घेणे असेच त्यांचे मिशन आहे का ही शंका येतेय. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यासह छत्रपतींबाबतचा उल्लेख या सर्व गोष्टी सांगतात की या पदावर जबाबदारीने भूमिका घ्यायची असते याची समज नसलेली व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पाठवलेली आहे. शिवछत्रपींच्या बद्दलचा उल्लेख पाहिल्यानंतर त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत," असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
"काल त्यांनी शिवाजी महाराजांचे कौतुक केले. पण हे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिक्रिया पाहून सुचलेले शहाणपण आहे. मला वाटतं की याचा निर्णय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घेतला पाहिजे. अशा व्यक्तीकडे जबाबदाऱ्या देणे योग्य नाही. पदवी देण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर शेवटी ते बोलायला उभे राहिले," असेही शरद पवार म्हणाले.
"तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, 'जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी' अशी उत्तरे दिली जात असत. परंतु महाराष्ट्रात मात्र तुम्हाला तुमचे आदर्श अन्यत्र शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील नायक आहेत," असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते.