Devendra Fadnavis On Sanjay Raut Death Threat: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जी धमकी आली आहे, त्या संदर्भात धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे त्याने दारुच्या नशेमध्ये अशी धमकी दिली आहे, यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल. आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, संजय राऊत यांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. तर धमकीप्रकरणात तथ्य असल्यास सुरक्षा वाढवली जाईल, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रमध्ये कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. कोणताही व्यक्ती असला तरी कारवाई होईल. 100 टक्के जे जे लोक चुकीचे काम करतील, बेकायदेशीर काम करतील त्यांच्यावर कारवाई होईल. मी पहिले या आधीही सांगितले आहे आणि आजही सांगत आहे. मी कोणाला घाबरत नाही आणि कोणाचा दबाव नाही, असे फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांचे गंभीर आरोप
तर सुळेंना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. याची मला कल्पना आहे. अनेक लोकांना असं मनातून वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही, तर बरं राहील. मात्र त्या सर्वांना माझा एवढे सांगणे आहे की, मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह विभागाचा प्रभार दिला आहे. त्यामुळे जे जे चुकीचे काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पाच वर्ष मी काम सांभाळलं आहे. आताही जे लोक बेकादेशीर काम करतील त्यांना मी सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
संजय राऊतांना धमकी आल्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. संजय राऊत हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे. हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे.झेपत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही बोलणार आहोत. संजय राऊत यांना तातडीने झेड प्लस सिक्युरिटी दिली पाहिजे, अशी माझी सरकारकडे आग्रहाची विनम्र विनंती राहील. या पद्धतीने कोणाची हिंमतच कशी होते, असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला आहे.