Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 2 (विशाल करोळे, झी 24 तास परळी) : आधीच बीड हा जिल्हा राजकीय जाणिवा जागृत असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यात कायम वर्गसंघर्ष कायम राहिला. ऊसतोड कामगारांचं शोषण होत राहिलं. गरिबी, दारिद्रात खितपत पडलेल्या समाजातून काहीजण पुढं येतात. पण त्याचा लोकशाहीपेक्षा ठोकशाहीवर जास्त विश्वास... त्यामुळंच वाल्मिक कराडसारखे गुंड इथल्या तरुणाईचे आदर्श झालेत. वाल्मिक कराड हा मुंडेंचा नोकर होता. नोकर ते परळीचा बेताज बादशाह असा त्याचा प्रवास हेवा वाटणारा वाटतो. त्यातूनच गल्लोगल्ली माफिया तयार झालेत. वाल्मिक कराडसारखा गुंड तरुणांना देव वाटू लागलाय. वाल्मिक फरार झाल्यानंतर रिल्सबाज टपराट गुंड वाल्मिकचं महिमामंडन करणा-या रिल्सचा रतिब सोशल मीडियावर घालतायते. आप्पा नाना, अण्णा काका अशी नावापुढं बिरुदं लावलेले गुंड गल्लोगल्ली फिरतायत. बीडचं राजकीय गुन्हेगारीकरण भयंकर वेगानं होऊ लागलंय.
बीडच्या राजकीय गुन्हेगारीबाबत आता सामान्य लोकंही बोलू लागलेत. राजकीय पक्षाचा विनयशील कार्यकर्ताच बीड, परळीत दुर्मिळ झालाय. गुंडाची फौज पदरी बाळगणारे नेते जिल्ह्यात तयार झालेत. सामान्यांशी अदबीनं, सन्मानानं बोलणारा कार्यकर्त्याच दिसत नाही. शिवराळ कार्यकर्त्यांच्या फौजाच बीडमध्ये फिरत असल्याचं स्थानिक सांगतात.
बीडमध्ये गेल्या काही वर्षांत जमिनीला सोन्याचा भाव आलाय. सातबारा रिकामा करवून घेणाऱ्या टोळ्यांचा जन्म झालाय. शासकीय प्रकल्पांसाठी अधीग्रहण होणाऱ्या जमिनींबाबत सरकार दरबारी असलेल्या बाबूंकडून आणि नेत्यांकडून माहिती मिळते. मग त्या माहितीच्या आधारे जमिनी जबरदस्तीनं विकत घेतल्या जातात. सुरुवातीला प्रेमानं नाही ऐकला तर पिस्तूलाची नळी कानाला लावून व्यवहार केले जातात. जमीन दे नाहीतर खल्लास अशी परिस्थिती बीडची आहे.
बेकायदा धंद्यातून बीडमध्ये पैसाच पैसा अशी स्थिती आहे. झटपट हातात आलेल्या पैशातून बीड जिल्ह्यात दारुचे पाट वाहतायत. एकट्या बीडचा विचार केल्यास बीडमध्ये 600 बारचे परवाने आहेत. बेकायदेशीर विक्री होणाऱ्या दारुचा हिशोबच न केलेला बरा... बीड शहरात पावलोपावली तुम्हाला बिअर बार दिसतील. बीड बायपासला तर फक्त दारुचीच दुकानं आहेत की काय अशी स्थिती आहे.
राखेतून पैसा, पैशातून दहशतीचं राजकारण सुरू आहे. इथं सुरक्षेपेक्षा मिरवण्यासाठी बंदुकांचे परवाने घेतले गेल्याचा आरोप होतोय. परवानाधारक बंदूक आणि पिस्तुलाचा वापर दहशत पसरवण्यासाठी केला जातो. मराठवाड्यात 1281 शस्त्रांचे परवानेने आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक परवानाधारक शस्त्र एकट्या बीडमध्ये आहेत. गेल्या काही वर्षांत बीडमधील गुन्हेगारीचा आलेख सातत्यानं वाढतोय. दिवसाढवळ्या मुडदे पाडले जातायत.
बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षात 308 खुनाचे गुन्हे दाखल आहेत.
तर मागील पाच वर्षात खुनाचे प्रयत्नाचे तब्बल 765 गुन्हे दाखल आहेत.
मागील पाच वर्षात बीड जिल्ह्यात 782 बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.
कोरोना काळात लॉकडाऊन असताना देखील बीड मध्ये 2020 मध्ये 32 खून झाले.
तर 2021 मध्ये 59 जणांच्या हत्या करण्यात आल्या.
2024 म्हणजे मागील वर्षी नोव्हेंबरपर्यंतच्या माहिती नुसार बीडमध्ये 39 हत्या झाल्यात.
बीड परळीतून माणूस गायब झाला की तो सापडतच नाही अशी अख्यायिका आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला बिहारची उपमा दिली जाते. पण परळीच्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणानं त्याची परिसिमा गाठलीये. महाराष्ट्राचं राजकारण हे देशात आदर्श राजकारण म्हणून ओळखलं जात होतं. पण परळीच्या राजकारणाच्या गुन्हेगारी पॅटर्ननं राजकीय संस्कृतीची राखरांगोळी केलीये हे खेदानं म्हणावं लागेल.