मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. रात्रीपासून राज्यात 117 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 2801वर पोहचली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत नव्या 66 रुग्णांची वाढ झाली आहे. तर त्याखालोखाल पुण्यात 44 रुग्ण वाढले आहेत.
धारावीत आज नवे 5 कोरोना रुग्ण आढळले. धारावीत कोरोना रुग्णांची संख्या 60वर पोहचली आहे. मुंबईत आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1822वर गेली आहे. तर 112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबई 66, ठाणे 3, मिरा-भाईंदर 2, वसई-विरार 1, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात मिळून 65 अशा एकूण 117 रुग्णांची वाढ झाली आहे.
दरम्यान, बुधवारी एका 29 वर्षीय महिला कोरोनाग्रस्त रुग्णाने मुंबईतील नायर रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना घडली. रुग्णालयातील बाथरुममध्येच महिलेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या विभागांत महापालिकेकडून रेड झोन घोषित करण्यात आला आहे. आतापर्यंत जी-दक्षिण (वरळी-प्रभादेवी), ई (भायखळा), डी (ग्रँट रोड), के-दक्षिण (अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम) आणि एच-पूर्व (वांद्रे पूर्व), कुर्ला (एल वॉर्ड) आणि मानखुर्द-गोवंडी-देवनार (एम-ई), एल विभाग कुर्ला आणि एम पूर्व चेंबूर, गोवंडी या विभागांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबाद हे संभाव्य जिल्हे रेड झोन ठरत आहेत.
तर धुळे, नंदूरबार, सोलापूर, वर्धा, परभणी, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिलोरी या जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये ग्रीन झोन जाहीर करण्यात आला आहे.