EXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

Maharashtra Politics : अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी आर आर पाटील यांनी लावल्याचा आरोप केला. अजित पवारांनी हा गौप्यस्फोट आताच करण्यामागचा हेतू काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आर आर पाटलांना तो निर्णय घेण्यासाठी कुणी भाग पाडलं का? असा सवालही या निमित्तानं विचारला जातोय.   

राजीव कासले | Updated: Oct 30, 2024, 07:58 PM IST
EXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान title=

Maharashtra Politics : सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे न्याय मिळाला असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे. झी  24 तासच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. सिंचन प्रकरणात (Irrigation Case) आपली काही चूक नव्हती. राजकीयदृष्ट्या आपल्या सरकारला फासावर लटकवलं गेलं, अशी प्रतिक्रिया पृ्थ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तसंच विनाकारण आपला राजकीय बळी दिला गेल्याची खंतही त्यांनी बोलू दाखवली. सिंचनाच्या आरोपांमुळे नंतर भाजप सरकार सत्तेत आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अजित पवारांच्या (Ajit Pawar) गौप्यस्फोटामुळे आपल्यावर ठेवण्यात आलेल्या ठपक्यातून आपली सुटका झाल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. सिंचन प्रकरणाबबतची चौकशी आपण लावल्याचा गैरसमज पसरवण्यात आला होता. त्या गैरसमजातून आपली मुक्तता झाल्याचं समाधान झी 24 तासवरील विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाणांनी बोलून दाखवली.

माजी गृहमंत्री आता आपल्यात नाहीत, त्यामुळे हे जर नसतं समोर आलं असतं तर बरं झालं असतं, आता राजकीय कारणासाठी गौप्यस्फोट झाला. पण यातून मला न्याय मिळेल की काय कोणाविरुद्ध चौकशी लावली किंवा कोणत्या पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, ही वस्तूस्थिती नव्हती. माझ्या डोळ्यासमोर केवळ राज्याचं हित होतं असं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. 

अजित पवारांचा गौप्यस्फोट
अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा मुद्दा  पुन्हा उकरुन काढलाय. घोटाळ्याच्या चौकशीच्या आदेशावर आर आर पाटलांनी सही केल्याचा गौप्यस्फोट अजितदादांनी केला. आबा हयात नसतावा ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांनी हा गौप्यस्फोट का केला याची चर्चा सुरु झालीय. केसानं गळा कापला ही म्हण त्यांनी कोणत्या जवळच्या माणसासाठी वापरली असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय. आर आर पाटील यांनी कुणाच्या सांगण्यावरुन हे आरोप केल्याचं अजित पवारांना सूचवायचं तर नाही ना अशी चर्चा या निमित्तानं सुरु झालीय. चौकशीच्या आदेशावर सही आबांनी कुणाच्या सांगण्यावरुन केली असेल तर माहित नाही असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय.

रोहित पाटील यांचं उत्तर
तर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना आर आर आबांना कुणी त्रास दिला हे माहिती आहे.. यावर योग्य वेळी योग्य उत्तर देणार, असं म्हणत रोहित पाटील यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.. आर आर आबांच्या अनेक मित्रांनी याबाबत मला सांगितलंय.. मात्र, योग्य वेळी उत्तर देण्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

सिंचन घोटाळ्याबाबत गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी अजित पवार आणि फडणवीसांवर गुन्हा दाखल करायला पाहीजे अशी मागणी संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी केलीये. तर राष्ट्रवादीच्या काळातच दादांची चौकशी करण्यात आल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय... त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून राजकारण तापलंय..