मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांनीच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर संजय देशमुख यांनी ऑनलाईन असेसमेंटचा निर्णय घेताना आपल्याला विश्वासातच घेतलं नसल्याचा या प्राध्यापकांचा आरोप आहे. यासाठी सोमवारी प्राध्यापकांची संघटना बुक्टूने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसवर विद्यार्थ्यांसहीत आंदोलन पुकारलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे इतर विद्यार्थी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसही या आंदोलनात सहभागी होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत. हे निकाल ३१ जुलैपर्यंत लावण्याचे आदेश खुद्द कुलपतींनी म्हणजेच राज्यपाल विद्यासागर राव यांनी कुलगुरु डॉक्टर संजय देशमुखांना दिलेत. त्यामुळे एका बाजूला ३१ जुलैपूर्वी निकाल लावण्याचं आव्हान कुलगुरु डॉक्टर संजय देशमुख यांच्यासमोर आहे. तर दुसरीकडे प्राध्यापक, विद्यार्थी आणि राजकीय संघटनांच्या रोषाचा सामनाही विद्यापीठाला करावा लागतोय.