मुंबई : आज सकाळीच ऐन गर्दीच्या वेळी पुन्हा एकदा मुंबईच्या रेल्वे प्रवाशांना वेठिला धरण्यात आलंय.
- सकाळी ११.१५ वाजल्याच्या सुमारास, तब्बल साडे तीन तासानंतर माटुंगा स्टेशनवरून पहिली लोकल पोलीस संरक्षणात रवाना... आंदोलकांना मार्गावरून हटवण्यात पोलिसांना यश
- भायखळ्याहून आसनगांवच्या दिशेनं पहिली ट्रेन रवाना... प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
- माटुंग्यातून दोन्ही दिशेनं रेल्वे रवाना, ठाण्यातूनही रेल्वे सुटली... स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
- रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाला मनसे, शिवसेनेचा पाठिंबा
- आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांची कुमक वाढवली
- ठाणे : माटुंग्यातल्या आंदोलनाचा प्रवाशांना मोठा फटका... अर्ध्या तासापासून ठाण्यातून एकही लोकल सुटलेली नाही... प्रवाशांची स्टेशनवर प्रचंड गर्दी
- प्रसंगावधान राखत मध्य रेल्वे मार्गावर कुर्ल्यापर्यंत गाड्या सुरू करण्यात आल्यात. कुर्ल्या-सीएसटी मार्गावर मात्र गेल्या दीड तासांपासून खोळंबा सुरूच आहे.
- प्रवाशांसाठी बेस्ट प्रशासनाकडून ज्यादा बसेसची सोय करण्यात आलीय.
- माटुंग्यातल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं दिसतंय. आंदोलकांकडून रेल्वेवर आणि पोलिसांवर दगडफेकीचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागलाय.
दादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरली. रेल्वे भरतीत गोंधळादरम्यान रेल्वे प्रशासनाचा आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांना रेल्वे प्रवाशांनना रोखून धरलं.
Due to some agitation between Matunga and Dadar, rail traffic affected between Matunga and CSMT...
— Central Railway (@Central_Railway) March 20, 2018
या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मात्र लगेचच कोलमडली. अजूनही लोकलची दोन्ही बाजुंची वाहतूक खोळंबलेली आहे. यामुळे मुंबईकरांना सकाळीच मनस्ताप सहन करावा लागतोय.
यामुळे, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झालाय. चाकरमान्यांना ऑफिसमध्ये पोहचण्याची घाई असल्यानं ते रेल्वे ट्रॅकवरून चालत ऑफिसकडे निघालेले दिसत आहेत.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. आंदोलकांना रेल्वे मार्गावरून बाजुला करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
पण, या निमित्तानं सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना पुन्हा एकदा रेल्वे प्रवासी वेठिला धरल्याचंच चित्र दिसून येतंय.