मुंबई : भांडूपमधील पोटनिवडणुकीत झालेल्या विजयाने हर्षभरीत झालेल्या भाजपला शिवसेनेने नांदेडच्या पराभवावरून चांगलेच लक्ष्य केले आहे. 'फक्त उपरणी बदलून इतरांना स्वपक्षात घ्यायचे व विजय साजरे करायचे उद्योग सुरू आहेत. नांदेडात ‘काँग्रेस’ पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मास आला नाही हे भांडुप विजयाचा उन्माद करणा-यांनी लक्षात घेतले पाहिजे!, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर बाण मारला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळकल्या जाणाऱ्या दै. सामनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लेख लिहीला आहे. या लेखात ठाकरे यांनी भाजपवर शेलक्या शब्दात निशाणा साधला आहे. विरोधकांना संपविण्याची ही युक्ती आज ‘नामी’ असली तरी बेनामी संपत्तीप्रमाणे ती अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. असे सांगतानाच, नांदेडात वा अन्य ठिकाणी ज्या विजयाच्या ललकाऱ्या आतापर्यंत देण्यात आल्या त्यात सत्त्व किती आणि तत्त्व किती हे प्रखर तत्त्वचिंतक, पारदर्शक भाजपवाले सांगू शकतील काय?, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
दरम्यान, निवडणुका जिंकत असाल हो, विजयही मिळत आहेत, पण जिंकणारे शुद्ध ‘भाजप’वासी किती व बाहेरून आलेले उपरे किती? भाडोत्री माणसे सत्तेची ताकद वापरून स्वपक्षात घ्यायची व त्यांनाच उमेदवाऱयांची झूल पांघरून लांडग्यांना हत्ती म्हणून मिरवायचे हा खेळ सध्या सुरू आहे. अगदी मुंबईतील भांडुप पोटनिवडणुकीच्या विजयानंतरही भाजपातील मंडळींना मुंबई महाराष्ट्रापासून तोडल्याचा जो आनंद झाला आहे तो विजय तरी शुद्ध भाजपचा आहे काय? असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.