www.24taas.com, पॅरीस
रात्रपाळी करणाऱ्या महिलांमध्ये दिवसभर काम करणाऱ्या महिलांपेक्षा ब्रेस्ट कँसरचा धोका अधिक असतो. एका संशोधनातून ही गोष्ट प्रकाशात आली. फ्रांसमधील इंसर्म युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांच्या एका ग्रुपने या गोष्टीवर संशोधन केलं.
या संशोधन करणाऱ्या ग्रुपचे प्रमुख पास्कल गिनेल म्हणाले, “आमच्या अभ्यासातून या संशोधनाला बळकटी मिळाली. रात्रीचं जागरण करणाऱ्यांना नेहमीच काही विकार होण्याची भीती व्यक्त करतात. पण, त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. कारण, रात्र पाळी करणाऱ्या स्त्रियांना स्तनांच्या कँसरचा धोका अधिक असतो.”
आजच्या काळात रात्रपाळी करणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढल्याने स्तनांच्या कँसरचंही प्रमाण वाढलं आहे. याबाबत शास्त्रज्ञांनी सांगितलं की स्त्रियांच्या मृत्यूचं महत्वाचं कारण म्हणजे स्तनांचा कँसर. विकसित देशांमध्ये दर १ लाख महिलांपैकी १०० महिला ब्रेस्ट कँसरग्रस्त असतात. दरवर्षी १३ लाख नव्या ब्रेस्ट कँसरग्रस्त महिलांची वाढ होत आहे. गेले चार वर्षं रात्रपाळी करत असलेल्या स्त्रियांचा अभ्यास केल्यावर संशोधक या निष्कर्षावर पोहोचले आहेत, की रात्रपाळी करणाऱ्या महिलांना स्तनांचा कँसर होण्याचा धोका अधिक असतो.