पुणे : बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त अर्थात प्रोसेडींग गेल्या दोन वर्षांपासून लिहिण्यातच आलेले नव्हते. विरोधकांनी प्रोसेडींगची मागणी केल्यानंतर ते अपूर्ण असल्याचं सिद्ध झाले. ते पूर्ण करण्यासाठी चक्क दोन कर्मचारी रात्रीचा दिवस करत प्रोसेडींग पूर्ण करत होते. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे बारामती न.प.चा असा हा 'पारदर्शक कारभार' पुढे आल्याची चर्चा आहे.
बारामती नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. मात्र याच नगरपरिषदेच्या प्रोसेडींगचं काम पूर्ण झालंच नव्हतं. विरोधकांनी प्रोसेडींगची मागणी केल्यानंतर ते सादर करण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करत होते. प्रोसेडींग अपूर्ण असल्याच्या संशयावरुन विरोधकांनी रात्री नगरपरिषद कार्यालयावर धाड टकाली आणि रात्रीच्या सुमारास प्रोसेडींग पूर्ण करणा-या कर्मचा-यांना रंगेहात पकडले.
दरम्यान नगरपरिषदेच्या कामकाजात काही बाहेरील लोक लुडबुड करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आला आहे. त्याचवेळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर राष्ट्रवादीच्या संतप्त नगरसेवकांनी घोषणाबाजी करत विरोधकांकडून दादागिरी केली जात असल्याचं म्हटले आहे.
याबाबत विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनीही लक्ष घालत याबाबत चौकशीचे आदेश दिलेत. यात दोषी असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही बापट यांनी दिल्याचं विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा नगपरिषदेतील कारभार कसा चालतो हे स्पष्ट झालेय, अशी कुजबूज दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे आता याप्रकरणी दोषींवर काय कारवाई होते याकडे सा-यांचं लक्ष लागले आहे.