www.24taas.com, नाशिक
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वादग्रस्त एल ई डी लाईट बसवण्याच्या नाशिक महापालिकेच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलीय. याविषयी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यानुसार एलईडी सहा घंटागाड्यांचा ठेका, घरकुल योजना अशा सर्वच वादग्रस्त विषयांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने मनसेला जोरदार झटका बसलाय.
नाशिक महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढत मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विषयांच्या चौकशीचे आदेश दिलेत. खासगीकरणाच्या माध्यमातून एलईडी बसविण्याचे महापालिकेचे मनसुबे मुख्यमंत्र्यांनी उधळून लावत संपूर्ण प्रक्रियेलाच स्थगिती दिलीय. राष्ट्रकुल स्पर्धेत काळ्या यादीत टाकलेल्या हैद्राबादच्या एमआयसी कंपनीला २१२ कोटी रुपयात शहरातील ७० हजार पथदीप हटवून एलईडी लाईट बसवायला देण्याच्या निर्णयाची बरीच चर्चा झाली होती. या निर्णयाविरोधात शिवसेना आणि अपक्ष गटाच्या नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी एलईडीसह घरकुल योजनेतील अनियमितता, घंटागाडी ठेका, श्वान निर्बिजीकरणसाठी उदगीरच्या कंपनीला दिलेला ठेका अशा अनेक वादग्रस्त विषयांवर आक्षेप घेतला असून त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे पालिकेत वर्षपूर्ती करणा-या मनसेला मोठा धक्का बसलाय.
महापौरांनी मात्र यासर्व आरोपांच खंडण केलं असून कुठलंही काम नियमबाह्य झालं नसल्याचा दावा केलाय. सत्ताधारी मनसे आपलं अंग कितीही झटकण्याचा प्रयत्न करत असली तरी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मनसेला चांगलाच झटका बसलाय. सुरवातीपासूनच एलईडीच्या प्रकाशावर संशय व्यक्त केला जात होता आता तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा विरोधकांचा दावाय. त्यामुळे न्यायालयीन लढाईसाठी आता विरोधक सज्ज झालेत.