Diwali 2023 Date: नुकताच गुढी पाडवा (Gudi Padwa 2023) उरकला. मराठी नववर्षाची अतिशय मंगलमयी सुरुवात करत सर्वांनीच रहा दिवस साजरा केला. त्यामागोमागच या वर्षभरात येणाऱ्या सणांचीही चर्चा सुरु झाली. सणवार म्हणजे सुट्ट्या, आपल्या माणसांची घरी सुरु असणारी ये-जा, खास मंडळींच्या भेटीगाठी आणि अमर्याद आनंद. असंच एक मंगल पर्व काही महिन्यांनी तुमच्या दारी येणार आहे. हे मंगल पर्व म्हणजे दिवाळीचं.
सहसा 5 दिवस या सणाची धूम असते. वसुबारस, धनतेरस, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे ते पाच दिवस. उत्तर भारतात दिवाळीत गोवर्धन पूजाही केली जाते. यंदाच्या वर्षीसुद्धा दिवाळीचा असाच माहोल असेल. पण, त्याआधी दिवाळी कधीये.... तारीख माहिती आहे का?
2022 मध्ये दिवाळीवर ग्रहणाचं सावट होतं. 2023 मध्येही या सणाच्या तारखेबाबत साशंकता आहे. हिंदू पंचांगानुसार दिवाळीचा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी ही अमावस्या 12 नोव्हेंबर, रविवारी येत आहे. (When is Diwali in 2023 day date time and mahurat details in marathi)
अमावस्येची सुरुवात दुपारी 2 वाजून 44 मिनिटांनी होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला सोमवारी 2 वाजून 56 मिनिटांपर्यंत असेल. परिणामी उदयातिथीप्रमाणं 13 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणं अपेक्षित आहे. पण, लक्ष्मीपूजन सायंकाळी केलं जातं. त्यामुळं यंदाच्या वर्षी दिवाळी, लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबरलाच करणं शुभ असेल.
लक्मी पूजनाचा मुहूर्त - सायंकाळी 17.40 ते 19.36 पर्यंत
शुभ काळ- 1 तास 55 मिनिटं
प्रदोष काळ- सायंकाळी 17.29 पासून 20.07 पर्यंत
वृषभ काळ - सायंकाळी 17.40 ते 19.36 पर्यंत
महानिशीथ काळात लक्ष्मीपूजन - रात्री 23.39 ते 00.31 पर्यंत
काळ- 52 मिनिटं
सिंह काळ - मध्यरात्री 00.12 ते 2.30
9 नोव्हेंबर 2023 - वसुबारस
10 नोव्हेंबर 2023 - धनत्रयोदशी
11 नोव्हेंबर 2023 - या दिवशी दिवाळीतील कोणतीही तिथी नाही
12 नोव्हेंबर 2023- नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन (मराठी दिनदर्शिकेनुसार सायंकाळी 5.59 ते रात्री 8.33 पर्यंत)
13 नोव्हेंबर 2023 - सोमवती अमावस्या
14 नोव्हेंबर 2023- बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा
15 नोव्हेंबर 2023 - भाऊबीज
(वरील माहिती सर्वसामान्य गृहितकांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )