Rohit Sharma: राजकोटमध्ये भारत-इंग्लंडदरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी रोहित शर्माने (Rohit Sharma) कॅप्टन इनिंग खेळत शानदार शतक (Century) ठोकलं. अवघ्या 157 चेंडूत रोहितने शतक पूर्ण केलं. कसोटी कारकिर्दीतलं रोहितच हे 11वं शतक ठरलं आहे. या शतकाबरोबरच रोहित शर्माने अनेक विक्रम मोडले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएम धोनीचा (MS Dhoni) कसोटी क्रिकेटमधला मोठा विक्रम रोहितने मोडला आहे. त्याचबरोबर माजी कर्णधार सौरव गांगुलीचाही 17 वर्ष जूना विक्रम मागे टाकला.
सौरव गांगुलीचा विक्रम मोडला
रोहित शर्माने राजकोट कसोटीत (Rajkot Test) सौरव गांगुलीचा 17 वर्ष जूना विक्रम मागे टाकला. रोहित शर्माने 66 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे सौरव गांगुलीपेक्षा जास्त धावा झाल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारताचा तो चौथा फलंदाज बनला आहे. तर सौरव गांगुली आता पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 424 सामन्यात 18575 धावा केल्या आहेत. आता रोहितने सौरव गांगुलीला मागे टाकलंय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
सचिन तेंडुलकर - 34357 धावा
विराट कोहली- 26733 धावा
राहुल द्रविड़ - 24208 धावा
रोहित शर्मा - 18577* धावा
सौरव गांगुली - 18575 धावा
धोनीचा विक्रमही मागे टाकला
रोहत शर्माने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही एक विक्रम मागे टाकला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणार रोहित शर्माचा हा भारताचा दुसरा फलंदाज बनला आहे. राजकोट कसोटीत रोहितने 2 षटकार मारताच त्याने धोनीला मागे टाकलं. धोनीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 78 षटकार जमा आहेत. तर रोहित शर्माने आता कसोटी क्रिकेटमध्ये 79 षटकार लगावलेआहेत. या यादीत टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 90 षटकार ठोकलेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज
वीरेंद्र सेहवाग - 90 (103 कसोटी)
रोहित शर्मा - 79* (57 कसोटी)
एमएस धोनी - 78 (90 कसोटी)
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
रोहित शर्माने 29 धावा करताच त्याच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला. इंग्लंडविरुद्ध 2000 धावांचा टप्पा पार करणारा रोहित शर्मा हा भारताचा नववा फलंदाज ठरला आहे. 47 व्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने हा कारनामा केला आहे. इंग्लंडविरुद्ध सर्धाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा आहे.