मुंबई : बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ५ विकेटने शानदार विजय झाला. हार्दिक पांड्या आणि लसिथ मलिंगा यांनी मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. लसिथ मलिगांने ४ विकेट घेतल्या, तर हार्दिक पांड्याने १६ बॉलने ३७ रनची खेळी केली. बॉलिंग करतानाही पांड्याने एक विकेट घेतली. हार्दिक पांड्याने पार्थिव पटेलला माघारी धाडलं. या विजयानंतर मलिंगा आणि हार्दिक पांड्याच्या कामगिरीची चर्चा होत असली, तरी कायरन पोलार्डने मुंबईच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. पोलार्डने या मॅचमध्ये नाबाद शून्य रन केल्या असल्या तरी त्याने मोक्याच्या क्षणी एबी डिव्हिलियर्सला रन आऊट केलं.
बंगळुरूची बॅटिंग सुरु असताना शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर दुसरी रन घेऊन पुन्हा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न एबी डिव्हिलियर्सने केला. पण अक्षदीप नाथने एबी डिव्हिलियर्सला माघारी धाडलं. या गोंधळामध्ये लॉन्ग ऑनवर उभ्या असलेल्या पोलार्डने डायरेक्ट हिट मारून एबी डिव्हिलियर्सला रन आऊट केलं. एबी डिव्हिलियर्स रन आऊट झाला तेव्हा तो ५१ बॉलमध्ये ७५ रनवर खेळत होता. अक्षदीप नाथने एबीला स्ट्राईक दिला असता, तर कदाचीत त्याने शेवटच्या तीन बॉलमध्ये मोठे फटके मारले असते. मलिंगाच्या या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला एबीने सिक्स मारली होती.
ABD caught off guard by Pollard https://t.co/XD4KDzIfEL via @ipl
— Viraj B. (@VirajB1) April 15, 2019
या ओव्हरमध्ये एबीची विकेट गेल्यानंतर मलिंगाने बंगळुरूला दोन धक्के दिले. एबीची विकेट गेल्यामुळे मुंबईने बंगळुरूला १७१ रनवर रोखलं. पोलार्डने केलेल्या या रन आऊटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
बंगळुरुने मुंबईला विजयासाठी १७२ रनचे आव्हान दिले होते. ते आव्हान मुंबईने ५ विकेटच्या मोबदल्यात १ ओव्हरआधी पूर्ण केले. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४० रन केल्या. तर हार्दिक पांडयाने निर्णायक वेळी ३७ रनची खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला.
मुंबईचा या पर्वातील हा ५वा विजय ठरला आहे. मुंबईने या पर्वात आतापर्यंत ८ मॅच खेळल्या असून केवळ ३ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. मुंबई अंकतालिकेत १० पॉईंटसह सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरुच्या या पराभवामुळे त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे.