मुंबई : आयपीएलचा यंदाचा सिझन 26 मार्चपासून सुरु होणार आहे. क्रिकेट चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहतायत. कोलकाता विरूद्ध चेन्नई हा पहिला सामना पहायला मिळणार आहे. मात्र आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण आयपीएलच्या सामन्यांसाठी चाहत्यांना आता स्टेडियममध्ये एन्ट्री मिळणार नसल्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या 15 व्या सिझनचे सामने चाहत्यांना पाहता येणार नाहीयेत. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने 25 टक्के प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी दिली होती. मात्र आता सरकारतर्फे हा आदेश मागे घेतला जाऊ शकतो.
केंद्र सरकारने महाराष्ट्रात कोरोनासंदर्भात गंभीर इशारा दिला आहे. ज्याचा परिणाम आयपीएलवर पडू शकतो. आयपीएलचे बहुतांश सामने मुंबई आणि पुण्यामध्ये होणार आहेत.
युरोप, दक्षिण कोरिया आणि चीन या भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढतायत. त्यामुळे आपण बेजबाबदारपणे वागणं योग्य नाही, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्याला आलेलं आहे. त्यामुळे राज्यात याच पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
गेल्या वर्षीही कोरोनाचा फटका आयपीएलला बसला होता. त्यावेळी कोरोनामुळे आयपीएलचा सिझन दुबईमध्ये शिफ्ट करण्यात आला होता. आताही कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्रात आयपीएलचे सामने होणार आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 171 प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार अलर्टवर आहे.