सेंच्युरिअन : दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८९ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. मनिष पांडे आणि धोनीनं केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला ४ विकेट गमावून २० ओव्हरमध्ये १८८ रन्सपर्यंत मजल मारता आली. मनिष पांडेनं ४८ बॉल्समध्ये नाबाद ७९ रन्स केल्या. यामध्ये ३ सिक्स आणि ६ फोरचा समावेश होता. तर धोनीनं २८ बॉल्समध्ये नाबाद ५२ रन्स केल्या. धोनीच्या खेळीमध्ये ४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.
या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला पाठवलं. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. ओपनिंगला आलेला रोहित शर्मा पहिल्याच बॉलला आऊट झाला. तर शिखर धवननं १४ बॉल्समध्ये २४ रन्सची खेळी केली. तीन नंबरला बॅटिंगला आलेल्या सुरेश रैनानं २४ बॉल्समध्ये ३० रन्सची खेळी केली. तर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला या मॅचमध्ये जास्त रन्स करता आल्या नाहीत. विराट १ रन बनवून आऊट झाला. यानंतर मात्र मनिष पांडे आणि धोनीनं नाबाद खेळी करून दक्षिण आफ्रिकेपुढे मोठं लक्ष्य ठेवलं.
दक्षिण आफ्रिकेकडून ज्युनिअर डालानं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर डुमनी आणि फेहलुक्वायोला प्रत्येकी एक विकेट मिळाली. ३ टी-20 च्या या सीरिजमध्ये भारतानं पहिली टी-20 जिंकली आहे. त्यामुळे दुसरी टी-20 जिंकून सीरिज जिंकण्याची संधी भारताला आहे.