मुंबई : भारतीय क्रिकेट जगतातील सध्याच्या घडीचे एक सुप्रसिद्ध आणि अत्यंत लोकप्रिय नाव आहे विराट कोहली. तो जे काही करतो त्याची बातमी बनते. मग क्रिडाविश्वातील एखादी घटना असो किंवा त्याच्या खाजगी आयुष्यातील एखादी बाब असो. त्याची चर्चा होतेच. एक सेलिब्रेटी असल्यावर काय वाटते किंवा खाजगी आयुष्यात तो काय कसा आहे, काय करतो याचा उलघडा त्याने आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत कोहलीने केला.
त्याचबरोबर त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील प्रवासाबद्दल आणि देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याबद्दल अभिमान असल्याचेही सांगितले.
कोहली म्हणतो, सातत्याने खाजगी जीवनात केल्या जाणाऱ्या ढवळाढवळीमुळे थोडा त्रास होतो. सेलिब्रेटीही सामान्य माणसांप्रमाणेच असतात आणि त्यामुळेच त्यांनाही थोडी स्पेस मिळायला हवी. मी माझ्या खाजगी आणि प्रोफेशनल लाईफचा चांगला बलन्स साधला आहे. जेव्हा मी कुटुंबासोबत असतो तेव्हा क्रिकेटपासून दूर राहतो. मित्रांना भेटण्याचा प्रयत्न करतो. सिनेमे पाहतो, ड्राईव्हवर जातो. माझ्या डॉगीसोबत वेळ घालवायला आवडतो.
आपल्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल विराट म्हणाला की, हा प्रवास अतिशय शानदार होता. मी वेस्ट दिल्लीच्या कॉलनीतून बाहेर पडत क्रिकेटर बनलो आहे. माझा प्रवास सोपा नव्हता कारण त्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. ज्युनिअर क्रिकेटपासून सुरुवात करत रणजी ट्रॉफी आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवसापासून माझे लक्ष्य देशासाठी क्रिकेट खेळणे आहे आणि यामुळे या टप्प्यावर मला अत्यंत अभिमान वाटतो. क्रिकेटच्या पीचवर उभे असताना जेव्हा देशवासीय आपला उत्साह वाढवतात तेव्हा वेगळेच वाटते. मी त्या क्षणांचा भरपूर आनंद घेतो.
बायोपिक बनवण्याबद्दल विचारले असता विराट म्हणाला की, याबद्दल मी काही विचार केलेला नाही पण कोणीजर माझ्यावर बायोपिक बनवण्याचा विचार केला तर बायोपिक अधिकतर माझ्या खऱ्या जीवनावर आधारीत असावी.