Maharashtra Politics : गेला आठवडाभर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शदर पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही राजीनामा आम्हाला मान्य नसल्याचे म्हणत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुत्रे हातात घेतली आहेत. या सर्व गोंधळावरुन मित्रपक्षांनी आणि विरोधकांनी हा त्यांच्या अंतर्गत पक्षाचा विषय आहे असे म्हणत बोलणं टाळलं होतं. मात्र आता ठाकरे गटाचे (Thackeray Group) मुखपत्र असलेल्या सामनातून शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणाबाबत भाष्य करण्यात आहे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावरुन महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने आता प्रतिक्रिया दिली आहे. "शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले," असा दावा सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या या दाव्याने आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राजीनाम्यानाट्याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी
"पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. शरद पवार यांनी जे राजीनामा नाट्य केले ते 'नौटंकी' होते, अशी टीका भाजपने केली. भारतीय जनता पक्ष हा एक पोटदुख्या पक्ष आहे. दुसऱ्यांचे चांगले व्हावे किंवा बरे घडावे असे त्यांना कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष किंवा घरे मोडून हा पक्ष उभा राहिला आहे. दुसरे असे की, इतरांवर 'नौटंकी' असा आरोप करण्यापूर्वी जगातील सगळय़ात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातकीर्त पावलेल्या आपल्या पंतप्रधान मोदींकडे त्यांनी आधी पाहायला हवे. देशाच्या राजकारणाची 'नौटंकी' करणाऱ्यांना दुसऱ्यांच्या घडामोडी नौटंकीच वाटणार," अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
भाजसोबत संधान बांधलेले अनेक जण शरद पवार यांनी नेमलेल्या कार्यकारणीत
"शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा 'प्लान' होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या 'लॉजिंग-बोर्डिंग'ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा 'प्लान' कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता व पवारांनी ते करण्यास नकार दिला. मिंधे गटाबरोबर आमदार-खासदार गेले, पण निवडणूक आयोगाने पक्ष त्यांना देऊनही त्यांचा तंबू रिकामाच राहिला आहे. राष्ट्रवादीचेही तेच घडले आहे. नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी शरद पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेच जण होते. पण कार्यकर्त्यांचा रेटा असा व भावना अशा तीव्र की, त्या कार्यकारिणीस पवारांचा राजीनामा नामंजूर करून 'यापुढे तुम्ही आणि तुम्हीच', असे पवारांना सांगावे लागले व तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडला," असा दावा सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
जे जातील त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील
"शरद पवार यांना मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता हे खरे, पण या निमित्ताने आपला पक्ष नक्की कोठे आहे व आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, त्यांना थांबवणार नाही, असे शरद पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. भाजपच्या लॉजिंग-बोर्डिंगमधले बुकिंग अद्याप रद्द झालेले नाही हे स्पष्ट आहे. जे जातील त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील. मग तो कितीही मोठा सरदार असो," असा इशाराही सामनातू देण्यात आला आहे.
शरद पवार यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, या सर्व दाव्यावर शरद पवार यांनी सोलापुरात बोलताना भाष्य केले आहे. "हे खर आहे की राजीनाम्याच्या निर्णयामुळे पक्षातील नेते, हितचिंतक अस्वस्थ होते. त्या सर्वांच्या आग्रहामुळे मला निर्णय बदलावा लागला. पण मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणजे पक्ष संघटनेचा काम सोडलं असा गैरसमज होता. पण तो गैरसमज आज दूर होतोय याचा आनंद आहे. मी काही तो अग्रलेख वाचलेला नाही. सामना किंवा सामनाचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्रित काम करतो. एकत्रित काम करत असताना पूर्ण माहिती घेऊनच त्यावर भाष्य करणे योग्य राहील नाहीतर गैरसमज होतात. पण मला खात्री आहे त्यांची भूमिका ऐक्याला पोषक अशी राहील. महाविकास आघाडीत सर्वकाही ठीक आहे काळजी करू नका," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.