'संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण...'; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका

Ahmadnagar News : अहमदनगरच्या प्रवरा साखर कारखान्यात गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे दलाल असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 21, 2023, 07:43 AM IST
'संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण...'; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका title=

Maharashtra Politics : राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदननगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संस्थेत  झाकीर नाईक कडून पैसे आल्याचा गंभीर आरोप प्रवरा शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळ्यामधून सुटका व्हावी म्हणूनच हे लोक भाजपामध्ये गेले आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे त्याने आयुष्यभर दलालीच केली आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील सामनातून करण्यात आलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत घेतलेल्‍या महत्त्वाच्या निर्णयांमुळेच देशातील सामान्‍य माणसाचे पाठबळ हे केंद्र सरकारच्‍या पाठीशी आहे. परंतु ज्‍यांच्‍या पक्षाला आमदार सोडून गेले, त्‍या पक्षाची आता विश्‍वासार्हता राहिलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या वृत्‍तपत्रातून येणाऱ्या मतांना कोणताही अर्थ उरला नाही," असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

"माधव गडकरी हे ज्येष्ठ संपादक होते. ते आज हवे होते. त्यांनी संजय राऊतचं कर्तृत्व कसं आहे ते सांगितलं असतं. मुंबई उच्च न्यायालयात एका महिलेसंबंधीचं प्रकरण सुरु आहे. असे लोक माझ्यावर जर आरोप करत असतील तर मला काही फरक पडत नाही. आयुष्यभर ज्यांनी दलाली केली त्यांनी दुसऱ्यावर कशाला बोलायचं? अशा लोकांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळते हेच आश्चर्यकारक आहे. हे सगळं माझ्या बदनामीचं षडयंत्र आहे," असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

विखे पाटलांनी फेटाळले आरोप

"ज्या विरोधकांनी आमच्यावर कोट्यावधी रुपयांच्या कर्जाचे आरोप केले आहेत, ते गेली अनेक वर्ष असे आरोप करत आहेत. त्यांच्या अनामत रकमा देखील कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी जप्त केल्या आहेत. प्रवरा शेतकरी सहकारी सोसायटी एवढी मोठी स्थापन केली, ती अवसायनात काढली. तिचं वाटोळं झाले आहे. याला जबाबदार असणारे लोक आता आमच्यावर आरोप करत आहेत. या म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत," असे विखे पाटील म्हणाले.

संजय राऊतांनी काय म्हटलं?

"विखे पाटलांवर अनेक आरोप आहेत. विखे पाटलांचे अनेक उद्योग आहेत. या संदर्भात आपण या आधीच बोललो आहे, पण प्रवरा सहकारी साखर कारखान्यात झाकीर नाईककडून आलेले पैसे हा कळस आहे. याची माहिती आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांना कळवली असून सरकार बरोबर असलेल्या अनेक मंत्री आमदारांनी आणि साखर सम्राटांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. या सगळ्या घोटाळ्यामधून सुटका व्हावी म्हणूनच हे लोक भाजपामध्ये गेले आहेत," असा आरोप संजय राऊत यांनी केला.