Corona vs Flu : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन हा डेल्टा स्ट्रेनपेक्षा सौम्य असल्याचं म्हटलं जात आह. अनेक तज्ज्ञ Omicron संक्रमित मध्ये फ्लू सारखी लक्षणे असल्याचा दावा देखील करत आहेत. यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने इशारा दिला आहे. कोरोनाला संसर्गाला फ्लूसारखा आजार समजू नका, असं WHO ने म्हटलं आहे.
डब्ल्यूएचओचे युरोपमधील वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी कॅथरीन स्मॉलवुड यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितलं 'आम्ही अजूनही मोठ्या अनिश्चिततेने वेढलेले आहोत. विषाणू आणखी वेगाने विकसित होत आहे, नवी आव्हाने उभी राहत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीला मर्यादित आजार म्हणून घोषित करण्याच्या स्थितीत आम्ही अद्याप नाही' असं स्मॉलवूड यांनी म्हटलं आहे.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर डब्ल्यूएचओने हा इशारा दिला आहे. सांचेझ यांनी कोरोनात फ्लू सारखी लक्षणं असल्याचं वक्तव्य केलं होतं. सांचेझ यांनी एका रेडिओ मुलाखतीत सांगितलं की, कदाचित वेळ आली आहे कोविड-19 ला फ्लूसारखा स्थानिक आजार मानला जावा, कारण त्याची तीव्रता कमी होत आहे. याचा अर्थ कोरोनाला साथीचा रोग न मानता स्थानिक आजार मानावा लागेल.
कोविड-१९ ला फ्लू समजू नका
कोविड-19 आणि फ्लूच्या लक्षणांची तीव्रता व्यक्तीच्या आरोग्यानुसार ठरवली जाते. गंभीर प्रकरणांमध्ये, दोन्ही संक्रमण श्वसन प्रणालीमध्ये पसरू शकतात आणि न्यूमोनिया सारखे आजार होऊ शकतात. नाक वाहणे, अतिसार, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि नाक बंद होणे ही समस्या दोन्ही संसर्गामध्ये दिसून येते. असं असलं तरी कोविड-19 हा फ्लूपेक्षा जास्त प्राणघातक आहे.
कोविड-19 आणि फ्लूमध्ये फरक कसा ओळखावा?
एका अहवालानुसार, कोविड-19 आणि फ्लू या दोन्हींमध्ये खोकला आणि ताप यासारखी लक्षणे अधिक लवकर दिसून येतात. कोविड-19 मध्ये नाक बंद होणं आणि जुलाब यासारख्या समस्या क्वचितच आढळतात, तर फ्लूमध्ये अशी लक्षणे अनेकदा दिसतात. कोविड-19 मध्ये काही रुग्णांमध्ये थकवा आणि अंगदुखीची लक्षणेही दिसतात, तर फ्लूमध्ये ही लक्षणे खूप तीव्र असतात.
शरीरातील लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ताबडतोब तपासणी करून घ्या. सुमारे 10 दिवस आयसोलेशनमध्ये रहा. संपर्कात आलेल्या लोकांना चाचण्या करण्याचा सल्ला द्या आणि बरे होण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.